आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधात सावलीत काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा
सावली तालुका प्रतिनिधी रोशन बोरकर
सावली : दिनांक 27/08/2026 महागाई, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या किमती, रासायनिक खतांचे वाढते दर तसेच सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने सावली येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. विधिमंडळ पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाला भरपावसातही हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भुजाडे पेट्रोल पंप येथून सुरू झालेला हा मोर्चा शहरातून मार्गक्रमण करत तहसील कार्यालय सावली येथे पोहोचला. विशेष आकर्षण ठरलेल्या बैलगाडीवरून मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला आक्रोश व्यक्त केला.

यावेळी बोलताना आ. विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. महागाई आणि वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे त्यांनी सांगितले. “ना खाऊंगा, ना खाने दूंगा” म्हणणाऱ्यांनीच देश लुटला, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.मोर्चानंतर शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले.
मोर्चामध्ये काँग्रेस नेते तथा माजी बांधकाम सभापती, जिल्हा परिषद चंद्रपूर दिनेश चिटरनुरवार, तालुका अध्यक्ष नितीन गोहणे, शहराध्यक्ष कृष्णा राऊत, महिला काँग्रेस अध्यक्ष उषाताई भोयर, शहराध्यक्ष भारती चौधरी, नगराध्यक्ष साधना वाढई, माजी नगराध्यक्ष लता लाकडे, माजी सभापती पंचायत समिती सावली विजय कोरेवार, माजी सभापती पंचायत समिती सावली राकेश गड्डमवार, कृउबा सभापती राजू ठाकरे, युवा तालुका अध्यक्ष किशोर कारडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नरेश सुरमवार, माजी नगराध्यक्ष विलास यासलवार, युवा शहर अध्यक्ष अंकुश शेंडे यांच्यासह तालुका, शहर, महिला व युवक काँग्रेसचे पदाधिकारी, नगरपंचायत पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, शेतकरी, युवक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


