न्यायालयीन लढ्याचा फटका काँग्रेसला, प्रभाग 10 मध्ये भाजपाचा विजय निश्चित!
मुल नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 ची निवडणूक येत्या 20 तारखेला होत असून, ही निवडणूक तब्बल 19 दिवस उशिराने होत आहे. या विलंबामागे काँग्रेस उमेदवार राहुल प्रेमलवार यांनी भाजपाचे उमेदवार निलेश राय यांच्याविरोधात हायकोर्टापर्यंत नेलेला न्यायालयीन लढा कारणीभूत ठरला. मात्र या निर्णयामुळे काँग्रेसलाच राजकीयदृष्ट्या मोठा फटका बसल्याचे चित्र या प्रभागात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले.
राहुल प्रेमलवार हे व्यक्तिशः सरळमार्गी व्यक्ती म्हणून ओळखले जात असले, तरी भाजपा उमेदवार निलेश राय यांचेशी थेट लढत देण्याऐवजी प्रेमलवार यांचा विजयाचा मार्ग सुकर करण्याच्या उद्देशाने काँग्रेस नेत्यांनी भाजपाचे उमेदवार निलेश राय यांच्याविरोधात न्यायालयीन अस्त्र उपसले. मात्र न्यायालयाचा निकाल निलेश राय यांच्या बाजूने लागला आणि काँग्रेसने उपसलेले अस्त्र त्यांच्यावरच उलटल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे मतदारांमध्ये काँग्रेसविरोधात प्रचंड नाराजी निर्माण झाली.
निवडणूक जाणीवपूर्वक लांबविल्याची भावना मतदारांमध्ये बळावत असून, “न्यायालयीन लढ्यामुळे आमचा मतदानाचा हक्क उशिरा वापरावा लागतोय” अशी नाराजी अनेक मतदारांकडून व्यक्त केली जात आहे. याचा थेट फटका आता काँग्रेस उमेदवार राहुल प्रेमलवार यांना बसत असल्याचे दिसून येते.
दुसरीकडे, भारतीय जनता पार्टीने या विलंबाचा पुरेपूर राजकीय फायदा घेतला आहे. भाजपाची शिस्तबद्ध संघटना, बुथ स्तरावरचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेते यांनी एकसंधपणे निलेश राय यांच्या प्रचारासाठी ताकद लावली आहे.
विशेष म्हणजे, राहुल प्रेमलवार हे पूर्वी भाजपाचे बुथ स्तरावरील कार्यकर्ते होते. त्यांनी अचानक काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतल्यामुळे त्या काळात भाजपाची बुथस्तरीय यंत्रणा विस्कळीत झाली होती. मात्र काँग्रेसने निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेत अडकविल्यामुळे मिळालेल्या संधीचा फायदा करीत भाजपाला आपली संघटना पुन्हा उभी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आणि त्याचा लाभ आता थेट निलेश राय यांना होत आहे.
निवडणूक लांबणीवर गेल्याने उमेदवाराचा खर्च वाढला अशातच काँग्रेस नेत्यांनी राहुल प्रेमलवार यांना प्रचारात एकटे सोडल्याने काँग्रेस उमेदवाराचा प्रचार सध्या विस्कटलेला दिसून येत असून, अंतिम टप्प्यातही प्रचाराला अपेक्षित दिशा मिळालेली नाही. विशेष म्हणजे, काँग्रेस उमेदवाराच्या निकटवर्तीयांकडूनच आता पक्षनेतृत्वाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली जात आहे.
“न्यायालयीन लढ्यात अडकविण्याऐवजी सार्वत्रिक निवडणुकीसोबतच ही निवडणूक झाली असती, तर शहरातील वातावरणाचा लाभ मिळाला असता आणि विजय सोपा गेला असता,” असा सूर काँग्रेसमधूनच उमटत आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय वेळीच मान्य केला असता आजची परिस्थिती उद्भवली नसती, अशी खंतही काँग्रेसच्या गोटात व्यक्त होत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, प्रभाग 10 मध्ये भाजपाचे उमेदवार निलेश राय यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात असून, आता केवळ बहुमताचा आकडा किती असेल याकडेच राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
उप संपादक सतिश राजुरवार
न्यूज इंडिया


